राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे लागले आहे. शिवसेनेत फूट पडण्याआधी दादरच्या शिवाजी पार्कात भव्य दिव्य दसरा मेळावा पार पडत होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदा कुणाचा दसरा मेळावा गाजणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) मेळाव्यावर बंधने यावीत यासाठी राज्यात चार दिवस आधीच म्हणजे दसऱ्यापूर्वीच आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) आचारसंहिता 8 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर तसेच हरियाणा राज्यांच्या विधानसभांचे निकाल जाहीर झाल्यावर कधीही लागू होण्याची शक्यता आहे. मात्र अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुंबईतील शिवाजी पार्कवर आवाज कोणाचा घुमणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.ठाकरेंची शिवाजी पार्कवर तर शिंदेंची बीकेसी मैदानावर तोफ धडाडणार आहे. दरम्यान दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्याकडून दोन्ही मैदानाची पाहणी केली जाणार आहे आणि अंतिम जागा निश्चित केली जाणार असल्याची माहिती मिळाली असून बीकेसी मैदान अंतिम होण्याची शक्यता आहे. याच ठिकाणी आधी देखील शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता. मात्र आता शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा नेमका कुठे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होण्याची शक्यता आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये तगडी फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण महायुतीतील तीन पक्ष आणि महाविकास आघाडीतील 3 पक्ष आमने-सामने असणार आहेत. शिवाय, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने अनेक विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी एकाच आघाडीत आहेत. त्यामुळे अनेक पक्षांमध्ये बंडखोर उभे राहण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर मतदारांसमोर बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीचा पर्यायही असणार आहे.. त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.