राजमुद्रा : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा वारे वाहू लागताना महायुतीसह महाविकास आघाडीने ही जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अशातच आता महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद सुरू असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा गृह जिल्हा असलेल्या भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील सातही विधानसभा जागांवर दावा सांगून या जागा खेचून आणण्यासाठी पटोले यांनी शड्डू ठेकला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला ही जागा सुटणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावरून रस्सीखेच सुरू असून मित्र पक्षातील शिवसेना उबाठाने भंडारा तर, राष्ट्रवादी काँग्रेसने तुमसर, भंडारा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चार विधानसभेवर दावा केलेला आहे. नाना पटोले दोन्ही जिल्ह्यातील एकही जागा सोडायला तयार नसल्यानं महाविकास आघाडीतील शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीची तुतारी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील दिसणार नाही, असं चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा पेच सुटणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या तरी महाविकास आघाडीतल्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. तर दुसरीकडे
जागा वाटपाच्या पूर्वीचं नाना पटोले यांनी दावा सांगून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना कोंडीत पकडले आहे. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुद्द नाना पटोले हे जागा सोडायला तयार नसल्याचं वक्तव्य केले अशी माहिती शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी दिली आहे. ते म्हणाले की, चरण वाघमारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाबाबतच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत पक्षाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे यांची त्यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच तुतारी हाती घेणार आहेत. तर दुसरीकडे भंडारा-गोंदियातील काँग्रेसचा दावा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे.