राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशातच महाविकास आघाडीत आता नवा ट्विस्ट आला आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील यांची महाविकास आघाडीत एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आला आहे. महायुतीला हरवण्यासाठी एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला आहे.. आता हा प्रस्ताव महाविकास आघाडी स्वीकारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीला आम्ही तसा प्रस्ताव दिला आहे..आमची यादी तयार आहे, आम्ही ५ जागा आधीच जाहीर केल्या आहेत. आम्ही कुठलीही तडजोड करायला तयार आहोत. आम्हाला राज्यात महायुती नको म्हणून आम्ही तडजोड करू अशी आमची तयारी आहे, असे एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीत येण्यासाठी एमआयएम तडजोड करण्यासाठी तयार आहे. एमआयएमने यापूर्वी अनेकदा महाविकास आघाडीकडे मोठ्या आशेने पाहिले. लोकसभेत त्याचा काही परिणाम झाला नाही. पण विधानसभेसाठी गणित बदलू शकतं का? काय आहे रणनीती? दोन टोकाचे विचार असणारे शिवसेना आणि एमआयएम एकाच मंचावर दिसतील का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल, शरद पवार यांचे पीए आणि नाना पटोले, अमित देशमुख यांना 10 सप्टेंबरला प्रस्ताव पाठवला आहे. तुम्ही हो म्हणाल तर आपण सोबत बसून जागा ठरवू असे आम्ही म्हटले आहे.. त्यामुळे महाविकास आघाडीत एमआयएमची एंट्री होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.