राजमुद्रा : गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. महाराष्ट्रात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला असून दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने राज्यात महाजनसंपर्क अभियान राबविण्याचे ठरवले आहे. उद्या म्हणजेच 6 ऑक्टोबरला नागपुरातून या महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर नागपूर पाठोपाठ राज्यभरात हा महाजनसंपर्क अभियान राबवला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपले प्रमुख उद्दिष्ट सांगत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या..त्या अनुषंगाने आता भाजपचे सर्व नेते नवनवीन रणनीती आखत विधानसभेसाठीची तयारी करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच आता राज्यात भाजप महाजनसंपर्क अभियान राबवणार आहे. या माध्यमातून एकाच वेळी शहरातील सर्व कार्यकर्ते घराबाहेर पडून घरोघरी जाऊन संपर्क साधतील. 6 तारखेला सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान हे महाजनसंपर्क अभियान होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र, राज्य पातळीवरील वरिष्ठ मंत्रीही यात सहभागी होऊन कार्यकर्त्यांसोबत गृहसंपर्क साधतील. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील यात सहभागी होणार आहेत.
आगामी विधानसभा च्या अनुषंगाने तयार केलेला हा मास्टर प्लॅन विधानसभेत कितपत फायद्याचा ठरणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..नागपूर नंतर विधानसभा निवडणूक घोषित होण्याअगोदर तसेच नंतर प्रचारादरम्यान राज्यात इतर ठिकाणीही अशी मोहीम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजपचे कार्य जनतेपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत पोहचवणार आहे. राज्यात नागपुरातून या महाजनसंपर्क मोहिमेची उद्या सुरुवात होणार असून एकाच वेळी शहरातील सर्व सहा मतदारसंघातील 2 हजार 158 बूथच्या भागात भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन संपर्क साधतील, अशी माहिती पुढे आली आहे. या महा अभियानाचा फायदा भाजपला होईल का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.