राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांचा कौल मिळवण्याचा निर्धार महायुतीसह आता महाविकास आघाडीने सुरू केला आहे.. महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती आता त्यानंतर महाविकास आघाडी ॲक्शन मोडवर आली असून काँग्रेसने विधानसभेसाठी मोठी नवी रणनीती करत घोषणा केली आहे..
कल्याण मध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांनी दहा हजार गरजू महिलांसाठी मोफत गॅस सिलेंडर रिफिलची घोषणा केली आहे. पातकर यांनी ही योजना स्वखर्चातून राबवण्याचा निर्णय घेतला असून, आगामी दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आता योजनेचा फायदा आघाडीला कितपत होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे… या निवडणूकीसाठी राजाभाऊ काँग्रेसकडून इच्छूक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीकरीता जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी गॅस सिलेंडरचे मोफत रिफिल देण्यात येत आहेत का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे…दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कल्याण पश्चिम आणि पूर्व ही जागा मिळण्यासाठी रणनिती आखली जात आहे. कल्याण मध्ये पक्षाचे पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांनी स्वखर्चातून 10 हजार गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर रिफिल करुन देणार अशी घोषणा त्यांनी केली आहे.
दरम्यान कल्याण डोंबिवलीत एकूण चार विधानसभा आहेत. या चारही विधानसभांपैकी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभेवर काँग्रेस दावा ठोकणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुती आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे..