राजमुद्रा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्यात दसरा मेळावा होत आहेत..साडे तीन मुहुर्तांपैकी एक असणारा दसरा सण आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यात राजकीय तोफा धडाडणार आहेत. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणारा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आधार मैदानावर पार पडत असलेला मेळावा विशेष चर्चेत आहे. शिवाय बीडमध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा ही दसरा मेळावा पार पडत आहे. त्यामुळे आज ते या मेळाव्यातून कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दसरा सण आणि विधानसभा निवडणूकिची पार्श्वभूमी असा मेळ घालत राज्यात आज राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.शिवसेना शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दसरा मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे काय रणशिंग फुकतील? शिवसैनिकांना कोणता कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये ही राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे..भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आहे. तर मराठा आरक्षणसाठी लढा देणारे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्यातील नारायण गड या ठिकाणी दसरा मेळावा घेत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आजच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जरांगे काही मोठी घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.