राजमुद्रा : राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच आज दसऱ्याच्या दिवशी राज्यात आज ‘राजकीय दसरा मेळावे’ होणार आहेत. मात्र या दसरा मेळाव्यापूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे.खरा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर संध्याकाळी होत आहे. तर डुप्लिकेट शिवसेनेचे काही लोक भाड्याने माणसं जमवून दसरा मेळावा घेतील असा घणाघात त्यांनी केला आहे..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणारा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आधार मैदानावर पार पडत असलेला मेळावा विशेष चर्चेत आहे. शिवाय बीडमध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा ही दसरा मेळावा पार पडत आहे. त्यामुळे आज ते या मेळाव्यातून कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. त्यांनी दसरा मेळाव्याची सुरुवात केली. दसऱ्याला एक विचारांचं सोनं त्यांनी दिलं. दसऱ्याच्या मुहूर्तावर देशाला महाराष्ट्र विचाराचं सोनं देत राहिला. ती परंपरा उद्धव ठाकरे यांनी जपली आहे. तुम्ही भले पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव चोरला असेल पण जनता ही मूळ शिवसेनेच्या बरोबर आहे. ते निवडणूक आयोग ठरू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
आगामी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना कोणाची हे नक्कीच समोर येईल.. मोदी-शाह यांच्या मेहरबाणीवर जगणारे की या मातीसाठी लढणारे यापैकी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा या राज्यातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे मुंबईतला आजचा दसरा मेळावा जो आहे हा उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..