राजमुद्रा : राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील झालेल्या अजित पवारांना ऐन विधानसभेच्या तोंडावर धक्क्यावर धक्के बसत आहेत.. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते आपल्या राजीनामावर ठाम असून त्यांनी पक्ष सोडू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांनी अजित दादांना रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार, याची चर्चा मोहोळच्या राजकारणात रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी उमेश पाटील यांनी आगामी राजकीय वाटचालीसाठी मेळावा घेत अजित पवार यांना सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र तत्पूर्वी राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिल्यानेही पाटील हे नाराज झाले होते, त्यामुळे अजितनिष्ठ म्हणून ओळख असलेले उमेश पाटील (Umesh Patil) यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित दादांना धक्का बसणार आहे..
उमेश पाटील यांनी घेतलेल्या त्याच मेळाव्यात काही उत्साही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडण्यासाठी पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे कार्यकर्त्यांकडूनही उमेश पाटील यांच्यावर अजित पवार यांची राष्ट्रवादी सोडण्यासाठी दबाव आहे. त्यातूनच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दरम्यान आता उमेश पाटील यांना महाविकास आघाडीतील काही पक्षांकडून ऑफर आल्याची माहिती आहे. मात्र, ते कोणता झेंडा हाती घेतात, याकडे मोहोळ तालुक्याचे लक्ष असणार आहे