धुळे राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील भारतीय जनता युवा मोर्चातर्फे १५ जून रोजी एमपीएससी परीक्षा व निकालासंबंधी आक्रोश आंदोलन केले जाणार आहे. त्यासंदर्भात भाजपाच्या युवा मोर्चाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने अखेर पुण्यात स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच शासनाने या परीक्षांची तारीख ताबडतोब घोषित करून निकालांचा मार्ग मोकळा करावा. सोबतच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची त्वरित नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
‘एमपीएससी परीक्षेसंदर्भात सरकारने दुर्लक्ष करू नये. या तरुणाच्या आत्महत्येला सरकारचा बेफिकीरपणा जबाबदार आहे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भा. द. वि. कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा तसेच ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा’, अशी मागणी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऍड रोहित चांदोड यांनी केली आहे.