राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची आजपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे..मात्र या आचारसंहितेपूर्वीच महायुती अधिक ॲक्शन मोडवर आली असून महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांपैकी ७ जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी आजच पार पडणार आहे. सध्या विधीमंडळात या शपथविधीची तयारी सुरु करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षापासून राज्यपाल नियुक्ती विधानपरिषद आमदारकीसाठी 12 लोकांची नियुक्ती रखडली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यपाल नियुक्त 12 पैकी 7 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली आहे. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे.या आमदारांचा शपथविधी आज दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडणार आहे. विधीमंडळामध्ये उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे.
यानुसार भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. आज हे सातही आमदार शपथ घेणार आहेत. दरम्यान दुसरीकडे ठाकरे गटाकडून या सात आमदारांच्या यादीवर आक्षेप घेण्यात आला आहे.