राजमुद्रा वृत्तसेवा | केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता मंत्रिमंडळ विस्ताराचंही काउंटडाउन सुरू झाल्याचं बोललं जात आहे. केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपाकडून वेगाने राजकीय हालचाली केल्या जात आहेत. मंत्रिमंडळ विस्तार करताना २० नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यासह अनेक नेत्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आलं असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावरच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची कर्नाटकाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे थावर चंद यांच्याबरोबर इतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून, यात काही राज्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपातील वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ मंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात २० नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं वृत्त असून, यात काही नावं स्पर्धेत आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, नारायण राणे, शांतनु ठाकूर, पशुपती पारस, सुशील मोदी, राजीव रंजन, संतोष कुशवाह, अनुप्रिया पटेल, वरुण गांधी, प्रविण निषाद यांची नावे सध्या चर्चेत असून, महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्याबरोबरच हिना गावित, रणजितसिंह निंबाळकर आणि प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. नितीश कुमार यांच्या जदयूने चार मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे या सगळ्यांचा सुवर्णमध्ये मोदी सरकार मंत्रिमंडळ विस्तार करताना कसा साधणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.