राजमुद्रा : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदाच्या विधानसभेला काका-विरुद्ध पुतण्या अशी थेट लढत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्यासंदर्भात सूचक विधान केलं होतं. मात्र आता अजित पवार हे बारामतीमधूनच लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे अजित पवारांच्या पुतण्यालाच म्हणजे युगेंद्र पवार यांना त्यांच्याविरुद्ध उभं करणार असल्याचं संभाव्य यादीमधून स्पष्ट होत आहे.त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काका पुतण्या भिडणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातव्यांदा या बारामती मतदारसंघातून विधानसभा लढणार आहेत. येत्या सोमवारी 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या मुहूर्तावर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढावी यासाठी कार्यकर्तेही आग्रह असल्याने त्यांनी इथूनच लढण्याचं ठरवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विधानसभेनंतर बारामती कोणत्या पवाराची असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत ही पवार विरुद्ध पवाराचा सामना रंगला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या पक्षाच्या विद्यमान खासदार आणि कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत झाली होती. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असल्याने या मतदारसंघातील पवार विरुद्ध पवार संघर्षात कोण बाजी मारणार याबद्दल कमालीची उत्सुकता होती. मात्र निकालाच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत ही पवार विरुद्ध पवार असा सांगणार असून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार जोमाने मैदानात उतरले असून बारामतीचा गड राखण्यासाठी त्यांनी नवा डाव टाकला आहे.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना ते रिंगणात उतरवणार असल्याचे स्पष्ट झाला आहे.. युगेंद्र पवार यांच्याकडे भावी नेतृत्व म्हणून पाहिलं जात असतानाच शरद पवार त्यांना थेट काका अजित पवारांविरुद्ध रिंगणात उतरवू शकतात असं सांगितलं जात आहे.