जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | विधानसभेत ओबीसी आरक्षणाच्या विषयावर झालेल्या गोंधळात भाजपचे १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. यात जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज जामनेर येथे आ. महाजन यांच्या पत्नी तथा नगराध्यक्ष साधना महाजन यांनी भाजप कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सहभागी झाले.
बाबाजी राघो मंगल कार्यालयापासून भाजपच्या मोर्चाला सुरुवात झाली. नगरपालिका चौकात ठिय्या आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचे अंतयात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष साधना महाजन, भाजपा तालुका अध्यक्ष, न. पा. गटनेते, सर्व नगरसेवक जि. प. सदस्य आणि गिरीश महाजन यांचे समर्थन करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी वाहने अडवून आंदोलन केले. तसेच एसटी महामंडळाचे बस देखील अडवून बस वर चढून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच तहसील कार्यालयात दुपारी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नगराध्यक्ष साधना महाजन व माजी पदाधिकाऱ्यांनी महा विकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करून तहसीलदार यांना निवेदन सादर केले.