राजमुद्रा वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून डॉ. भारती पवार, (नाशिक) आणि हिना गावित (नंदुरबार) यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी महाराष्ट्रातून भाजप नेते नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील यांना दिल्लीत बोलावण्यात आले होते. त्यामुळे दिग्गज राजकीय नेत्यांचे या घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या खासदार भारती पवार आणि नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्या दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री पद दिले जाण्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या विस्तारात उत्तर महाराष्ट्रातून डॉ. भारती पवार व हिना गावित यांना संधी मिळणार असल्याचे दिसू लागले आहे. या नेत्यांच्या बदल्यात कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कापला जाणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे.
भारती पवार यांनी ५ जुलै २०१९ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत देखील लाखोंच्या घरात मतदान घेणाऱ्या भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्तीय ए. टी. पवार यांच्या स्नुषा आहेत. त्यामुळे भारती पवार यांच्या निमित्ताने भाजपने उत्तर महाराष्ट्रातील आणखीन एक मोठे घराणे गळाला लावल्याचे बोलले जात आहे. त्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा होत्या. स्वतः डॉक्टर असल्याने एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा समोर येणार आहे. तसेच हिना गावित यांचे कार्य देखील नंदुरबार जिल्ह्यात परिचित आहे. आदिवासींसह विविध शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले आहे.