धुळे राजमुद्रा वृत्तसेवा | विधानसभेत गैरवर्तणूक केल्याच्या आरोपावरून भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केले आहे. त्यानंतर माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत यासंदर्भात परिपत्रक काढून अनिल गोटे यांनी राजकीय धमाल उडवून दिली आहे. चूक नसताना देखील माफी मागण्याची सभ्यता फडणवीस, शेलार यांना आली कशी? असा सवाल अनिल गोटे यांनी केला आहे. फडणवीस स्वतःला महात्मा गांधी, विनोबा, तुकाराम महाराज व येशू ख्रिस्त समजतात का? कारस्थाने करून महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आणण्याचा डाव भाजपवरच उलटला असल्याचे ते म्हणाले. कारस्थानी फडणवीसांना शांत समयी ठाकरेंचा मजबूत दणका बसला. संसदीय आयुधांचा दुरुपयोग करण्याचे कारस्थान विधानसभा अध्यक्षांनी उधळून लावले. खोटे बोलणे. लाड्यालबाड्या करणे हा तर भाजपचा स्थायीभाव असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले आहे.