नंदुरबार राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टीला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाआघाडी करून निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविणार आहेत.
यासंदर्भात झालेल्या राजकीय पक्षाच्या बैठकीत सकारात्मक चर्चेतून निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्याप जागावाटपाचा फॉर्मुला ठरला नसल्याने हा विषय थंडबस्त्यात पडून आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणूकीत सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यात कोणी पूर्ण अकरा जागांवर तर, कोणी काही ठराविक जागांवर उमेदवार देण्याचे नियोजन केले आहे. मात्र निवडणुकीतील चुरस पाहता भाजपाला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा नेत्यांमध्ये बैठक होऊन महाआघाडी करून रिंगणात उतरण्याचा निर्णय झाला आहे.
सदस्यत्व रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या अकरा जागांपैकी सर्वाधिक सात जागा भाजपच्या आहेत तर, शिवसेना व काँग्रेस यांच्या प्रत्येकी दोन आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा गेली नाही. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपल्या पदरी जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या पाडून घेण्यासाठी तयारी केली आहे. त्यात त्यांनी नंदुरबार तालुक्यात तीन शहादा तीन व अक्कलकुवा एक असे सात गटात उमेदवार दिले आहेत. तर पंचायत समितीसाठी त्यांना शहाद्यात चांगले वातावरण असल्याने त्यांनी नंदुरबार व शहाद्यात आठ गणांमध्ये उमेदवार दिले आहेत. शिवसेनेने व काँग्रेसने सर्वच जागांवर उमेदवार दिले आहेत. दरम्यान फॉर्मुला ठरत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत असल्याने राजकीय पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऍड. के सी पाडवी, ऍड. पद्माकर वळवी, दिलीप नाईक, चंद्रकांत सूर्यवंशी. जिल्हा प्रमुख डॉ. विक्रांत मोरे, आमशा पाडवी, ॲड. राम रघुवंशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांची तीन वेळेस बैठक होऊनही जागावाटपाचा तिढा कायम आहे. खरी बोलणी शिवसेना व काँग्रेस मध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महाआघाडी तर करायची मात्र जागावाटपाचा प्रश्न दूर होत नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार सज्ज ठेवले होते. १२ जुलै पर्यंत माघारीची मुदत आहे. तोपर्यंत जागावाटप निश्चित झाले तर, ज्या पक्षाला ज्या गटात व गणात जागा दिली जाईल त्या गट व गणातून महाआघाडीचे इतर पक्षाचे उमेदवार माघार घेऊन ती जागा संबंधित मित्रपक्षाला सोडणार आहेत. असे असले तरी महाआघाडीतील तिनी पक्ष सावध भूमिका घेत आहे.