जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात नोटीस वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकाराने बंडखोर नगरसेवक आणि शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
महापालिकेत महापौर निवडणुकीदरम्यान भाजपच्या २७ फुटलेल्या बंडखोर नगरसेवकांना नाशिक विभागीय आयुक्त राजाकृष्ण गमे यांनी अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळे आधीच कायदेशीर लढा देणाऱ्या बंडखोरांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी पूर्वाश्रमीच्या भाजप नगरसेवक असलेल्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेचा महापौर उमेदवार असलेल्या जयश्री महाजन यांना पाठिंबा दिला होता. भाजप फुटीच्या उंबरठ्यावर असताना तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रवेश केलेल्या तीन नगरसेवकांना शिवबंधन बांधण्यात आले होते. दरम्यान भाजपाने यासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये बंडखोर असलेल्या नगरसेवकांची संपूर्ण कुंडली आहे.
बंडखोर २७ नगरसेवकांना महापालिकेच्या माध्यमातून आज ही अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भातली नोटीस वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसात संबंधित नगरसेवकांना ही नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यावर आपले म्हणणे सात दिवसाच्या आत सादर करण्यासंदर्भात संबंधितांना बजावण्यात आले आहे. या नोटीसमध्ये मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पार्टी करण्यात आली आहे. नोटीस आज (ता. ७) बुधवार रोजी दुपारपासून सुरू झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या दोन दिवसात नोटीस वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याबाबत आयुक्तांशी देखील भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे.