राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना भोसरी भूखंड प्रकरणी केव्हाही ईडीकडून अटक होऊ शकते. कारण न्यायालयातून ईडीने स्थगिती उठवली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या अटकेच्या कारवाईत ससेमिरा सुरू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, एकनाथ खडसे ईडीला चौकशीत सहकार्य करत असतील तर त्यांच्यावर अटकेची कारवाई कशासाठी अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) केली होती. भोसरी येथील भूखंड प्रकरण सध्या गाजत असून यासंबंधी ईडी कडून खडसे यांच्या जावयाला नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ईडीचे खास पथक जळगावला दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच भोसरी येथील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना ईडीने काही महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती. ‘ईडी आपल्यावरील आरोपांचा गैरवापर करत असून जोपर्यंत सुनावणी सुरू आहे तोपर्यंत अटकेची कारवाई करू नये’, यासाठी खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड गैरव्यवहाराबाबत ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी अटक होण्याच्या शक्यतेमुळे भाजपामधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान या प्रकरणाला स्थगिती मिळाली होती. मात्र आता ती उठवण्यात आली आहे. त्यामुळे खडसेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. ४ फेब्रुवारीला उच्च न्यायालयाने खडसेंवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली होती.
ईडीच्या तपासकामात आपण सहकार्य करणार असल्याने आपणास अटक करण्यात येऊ नये असे खडसे यांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र या संदर्भातील स्थगिती ईडीने न्यायालयातून उठवली आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.