राजमुद्रा : पोलीस दलातील आदर्श खेळाडू जयेश यशवंतराव मोरे यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला असून त्यामुळे पोलीस दलातील शान वाढली आहे. अशा आदर्श खेळाडूंमुळे पोलीस दलाची मान उंचावली आहे. यापुढेही आदर्श खेळाडूंनी पोलीस दलात गौरवाची परंपरा कायम ठेवावी, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .महेश्वर रेड्डी यांनी केले.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त पोलीस जयेश मोरे यांचा पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर तसेच पोलीस क्रीडा प्रमुख संतोष सुरवाडे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सरकारने सन 2022-2023 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. त्यात जळगाव जिल्हापेठ पोलीस दलातील पोलीस जयेश यशवंतराव मोरे यांना सॉफ्टबॉल या क्रिडाप्रकारात शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानिमित्त त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
पोलीस जयेश मोरे हे सॉफ्ट बॉल या खेळातील उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू असून ते शालेय जीवनापासून ते आता कर्तव्य बजावितानही हा खेळ खेळत आहेत. आतापर्यंत ते (वर्ल्ड कप) अर्जेंटिना ( पराना) आणि (वरिष्ठ गट एशिया कप)जपान (टोकियो) येथे त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच सलग सात वर्ष महाराष्ट्राच्या संघाने पदक प्राप्त केले. त्या संघाचे कर्णधार पद भूषविले आहे.अनेक राष्ट्रीय स्पर्धा, फेडरेशन कप, राज्यस्तरीय स्पर्धा यात महाराष्ट्राचे, जळगावचे प्रतिनिधित्व केले आहे, अशी माहिती जाणून घेत ही बाब पोलीस दलासाठी अभिमानास्पद आहे, असा गौरव डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केला. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी मार्गदर्शन केले. तसेच सॉफ्टबॉल खेळासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या उत्कृष्ट खेळाडूस जर असे पुरस्कार मिळाले,तर त्याच्याही आयुष्याचे सोने होते ,त्याच्या मेहनतीला,कामगिरीला न्याय मिळतो.त्याच्यासोबत खेळाची ही प्रतिमा उंचावते, असे मत पोलीस जयेश मोरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या खेळासाठी आणि पुरस्कारासाठी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तथा महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघाचे राज्य सचिव प्रा. डॉ. प्रदीप तलवेलकर, संघ मार्गदर्शक किशोर चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. जयेश मोरे हे जि.प. विद्यानिकेतन व कानिष्ठ महविद्यालय जळगावचे माजी प्राचार्य प्रा.यशवंतराव मोरे आणि ज्योत्स्ना मोरे, रांजणगाव ,ता.चाळीसगाव यांचे जेष्ठ सुपुत्र आहेत. हा पुरस्कार मिळाल्याने जयेश मोरे आणि सोबत खेळातील मार्गदर्शक व कुटुंबीयांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.