(राजमुद्रा जळगाव) जळगाव जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावरील वाढती संख्या पाहता नागरिकांची होणारी गैरसोय रोखण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना लसीकरण सुविधेमध्ये वाढ करण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन सादर केले आहे. लसीकरणाचा वाढता आकडा पाहता 18 ते 44 आणि 45+ अशा दोन गटात होणारे हे लसीकरण अधिक सुरळीत होण्यासाठी व नागरिकांची गैरसोय न होता शांततेत लसीकरण पार पडण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजनाही सुचवल्या आहेत.
लसीकरण केंद्रावर होणारी धावपळ पाहता जळगाव शहरातील लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करणे, लसीकरण केंद्रावर अँटिजेन तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, दोन वेगवेगळ्या वयोगटातील लसीकरणासाठी वेगवेगळी केंद्रे तयार करून सुरळीत लसीकरण करणे, पहिला आणि दुसरा डोस देण्यासंदर्भात स्वतंत्र केंद्र नेमणे, नागरिकांची गैरसोय होणार नाही यासंदर्भात पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहे तसेच बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणे, लसीकरण केंद्रावर गर्दी नियंत्रणासाठी तसेच नागरिकांकडून नियमांचे पालन करून घेण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना दुर्दैवाने काही त्रास उद्भवल्यास खबरदारी म्हणून केंद्रावर एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे या ठळक मुद्द्यांवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सदर निवेदन सादर केले आहे.