जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा पूर्वी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अग्रेसर होता. परंतु सध्या ‘जिल्ह्यात केवळ चौकशी हे शब्द राजकारणात शिल्लक राहिलेत का?’ असा सवाल उपस्थित होत आहे. सर्व नेत्यांचे वर्चस्व राजकारणात चांगले होते. मात्र सध्या चौकशीच्या फेऱ्यात नेत्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे नेते मानले जातात. परंतु सध्या ते भोसरी जमीन खरेदी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.
दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यादृष्टीने आज त्यांना मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी बोलावले. दरम्यान ईडीने खडसे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे.
ती जमीन उकानी यांच्या मालकीची
एकनाथ खडसे हे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले तरी, ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे?’ याचा उलगडा होऊ लागला आहे. अनेक बाबी या चौकशीच्या माध्यमातून समोर येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे भोसरी येथील जमीन ही उकानी यांच्या मालकीची होती. जून २०१५ मध्ये मूळ मालक यांनी शासनाला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावून भूसंपादन कायद्याच्या तरतुदीनुसार २४० कोटी रुपये अदा करून जागेचे अधिग्रहण करावे, अशी मागणी केली होती. असे सूत्रांनी सांगितले.
तातडीने घेतली मीटिंग
भोसरी जमीन प्रकरण राज्यात गाजत असताना नवनवीन माहिती उजेडात येत आहे. त्यानुसार तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची दालनात बैठक घेऊन भूसंपादन करण्याच्या दृष्टीने तात्काळ कृती करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार जागामालकाला लाभ होईल या दिशेने संबंधित अधिकाऱ्यांनी महसूल मंत्री खडसे यांच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू केली होती. असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या जमीन खरेदी व्यवहारात एकनाथ खडसे चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.