राजमुद्रा : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे.. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 4136 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान ठरवणार आहे.. अशातच नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघाकड राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे.. या मतदारसंघात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal), दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिकमधून (Nashik District Vidhan Sabha Election 2024) मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात पंधरा जागांसाठी 196 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला असणार हे विधानसभा निकालानंतर स्पष्ट होणार आहे..
नाशिक जिल्ह्यातील 15 जागांसाठी 196 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. फक्त तीनच ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने लढत आहेत. तर सात ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार रिंगणात आहेत. नांदगाव, इगतपुरी, चांदवडमध्ये अपक्षांनी कडवे आव्हान उभे केले आहेत.जिल्ह्यात शिंदे गटाच्या वाट्याला नांदगाव आणि मालेगाव बाह्य या दोन जागा आल्या आहेत. तिसरी जागा देवळालीत राजश्री अहिरराव यांना शिवसेना शिंदे गटाने एबी फॉर्म दिला. त्यामुळे तेथे महायुतीच्या उमेदवारासमोर एकाच वेळी महाविकास आघाडी आणि शिंदे गटाच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे.
नाशिक शहरातील तीन मतदारसंघात महायुतीला तगडं आव्हान असणार आहे.. यामध्ये नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य या मतदारसंघात पूर्वमध्ये भाजपाच्या उमेदवाराविरोधात पूर्वाश्रमीचे भाजपाचेच गणेश गिते यांचे आव्हान आहे. मध्य मतदारसंघात भाजपाच्या देवयानी फरांदे यांच्याविरोधात उबाठा गटाचे वसंत गिते यांनी आव्हान निर्माण केले असले तरी वंचितने येथे मुशीर सय्यद यांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण होणार आहे. त्यात येथील लढाईला हिंदुत्ववादाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातही भाजपाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात उबाठाचे सुधाकर बडगुजर हे लढत देत असले तरी ऐनवेळी भाजपातून मनसेत दाखल झालेल्या दिनकर पाटील यांनी या दोन्ही उमेदवारांपुढे आव्हान निर्माण केल्याने येथील लढत तिरंगी आणि अटीतटीची बनली आहे.
दरम्यान मालेगाव बाह्य मतदारसंघात दादा भुसे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांनी कडवे आव्हान निर्माण केले असतानाच अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचेही आव्हान निर्माण झाले आहे. नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे यांच्या विरोधात उबाठा गटाचे गणेश धात्रक रिंगणात असले तरी येथे अपक्ष समीर भुजबळ आणि डॉ. रोहन बोरसे यांचेही आव्हान आहे. निफाड मतदारसंघात उबाठा गटाचे अनिल कदम आणि महायुतीचे दिलीप बनकर यांच्यात सरळ लढत होत आहे. प्रहारने येथे गुरुदेव कांदे यांना उमेदवारी दिली असली तरी खरी लढत बनकर आणि कदम यांच्यातच दिसून येत आहे.
बागलाणमध्ये विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्याविरोधात दीपिका चव्हाण या पारंपरिक विरोधकांत लढत होत आहे. त्यात बोरसे यांच्याविरोधात भाजपातीलच काही मंडळी असल्याने ते आपली रसद दीपिका चव्हाण यांना पुरविल्यास येथे बोरसेंसाठी धोक्याची घंटा ठरणार.. या मतदारसंघात मतदार जुन्या चेहऱ्यांना संधी देणार की परिवर्तन घडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे