मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे लागलेला ईडीच्या अधिकाऱ्यांचा ससेमिरा वाढत असून, ईडीकडून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत.
मुंबईच्या ईडी कार्यालयाने आज एकनाथ खडसे यांची चौकशी केली. या चौकशीतून अनेक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. दरम्यान ज्या जमिनीचा भूसंपादन मोबदला 200 कोटींपेक्षा जास्त प्रस्तावित होता, ती जमीन एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी जून २०१६ मध्ये फक्त ३.७५ कोटी म्हणजे पावणेचार कोटी मोबदला देऊन खरेदी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जमिनीचा मोबदला एवढा कमी देऊन संबंधित जमीन खरेदी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान एकनाथ खडसे यांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मैदानात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यासंदर्भात जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पद्धतीने खडसे यांना अडकवत असल्याचा आरोप केला आहे. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकनाथ खडसे यांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आता पुढे सरसावले आहेत.
भोसरी जमीन खरेदी प्रकरण आणि त्यामध्ये झालेला घोटाळा सध्या मोठ्या प्रमाणात राज्यात गाजत आहे. या प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाल्यानंतर आता ईडी अधिकाऱ्यांची नजर आणखी कोणा कोणावर जाते याकडे राजकीय लक्ष लागून आहे. कारण जमिनीचा शासकीय बाजार भाव आणि भूसंपादन मोबदला दोनशे कोटीपेक्षा जास्त प्रस्तावित असल्याने खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याचे ईडी सूत्रांनी सांगितले.