राजमुद्रा : नव्या सरकारचा शपथविधी तोंडावर आला असताना महायुतीत राजकीय हालचाली वाढल्या आहेत. नुकतच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या सर्व बैठका रद्द केल्या असताना आता दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सत्ता स्थापनेबाबतच्या चर्चेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली दरबारी रवाना झाले आहेत.. अजित पवार यांची दिल्लीत जाऊन मंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..
दिल्लीत होणाऱ्या आजच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मंत्री अमित शहा यांच्यामध्ये खातेवाटपावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. मागच्या वर्षी जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांना नऊ मंत्रिपदं दिली गेली होती. असं असताना आता अजित पवार गटाला किती मंत्रिपदं मिळणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
नव्या सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होणार असून या नव्या सरकारमध्ये कोण कोण शपथ घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे. शपथविधीची तारीख जाहीर झाली असली तरी मुख्यमंत्री कोण असणार याबाबतची घोषणा अजूनही झाली नाही.. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कोण असणार आणि गृहमंत्री पदावर अडून बसलेले एकनाथ शिंदे आपला गृहमंत्री पदावरील दावा सोडणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.
दरम्यान दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या ‘सागर’ बंगल्यावर भाजपचे महत्त्वाचे नेते पोहोचले आहेत. चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर आणि गिरीश महाजन, माधुरी मिसाळ राजेंद्र राऊत आणि अनिल बोंडे हे नेते देवेंद्र फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजप नेत्याची महत्वाची बैठक होत आहे.