मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | भोसरी येथील बहुचर्चित भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांना देखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे आता या चौकशीची व्याप्ती वाढणार असून मंदाताई खडसे देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
भोसरीच्या भूखंड प्रकरणाची ईडीच्या माध्यमातुन चौकशी सुरू आहे. यात जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे, तर कालच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची देखील चौकशी करण्यात आली. आता याच प्रकरणात खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. मंदाताई खडसे आणि गिरीश चौधरी यांनी संयुक्तरीत्या भोसरी येथील भूखंड खरेदी केला होता. गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर खडसे कुटुंबीयांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे आधीच मानले जात होते.
दरम्यान मंदाताई खडसे यांनी यासंदर्भात मुदत मागून घेतली आहे. यामुळे त्यांची लागलीच चौकशी होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच मंदाताई खडसे यांना ७ जुलै रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. परंतु त्यांनी १४ दिवसांची वेळ मागितल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या चौकशीची शक्यता कमी आहे. मात्र त्यांच्याकडील चौकशीतून मोठे गभाळ उघडकीस येण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ईडीकडून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.