पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे लवकरच पुनरागमन झाले आहे. त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाने आणखी काही दिवस उशीर केला असता, तर शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणी करण्याचे संकट येण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, आता काहीही काळजीचे कारण राहिलेले नाही.
देशासह महाराष्ट्रात येत्या १२ जुलैपासून मॉन्सून जोरदार पुनरागमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालचा उपसागर, ओडिसा, पश्चिम बंगालच्या समुद्री किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. तसेच, देशाच्या उत्तर-पश्चिम भागात रखडलेला मोसमी पाऊसही कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा सक्रिय होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
पुणे वेधशाळेने कोकण, गोवा, विदर्भ आणि घाट माथ्यावर मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळेच दुबार पेरणीचे संकट दूर होणार आहे.
सिंधुदुर्गमध्ये आज, रत्नागिरीला ११ जुलैला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्हांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील मॉन्सून परतीला हेच कारण महत्वाचे ठरले आहे. आंध्र प्रदेश आणि ओडीशाच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाला आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले आहे. यापुढील काळात काही दिवस राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.