राजमुद्रा : राज्यात महायुतीच नव सरकार स्थापन झाल असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आजपासून विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी उद्या म्हणजेच रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नार्वेकर यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे, असं झाल्यास ते रविवारी अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करतील.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आणि शिवसेना शिंदे गटाने विधानसभेचे अध्यक्षपद आपल्याला मिळावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण भाजपने हे पद आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल हे ही निश्चित केले आहे. महायुतीचा उमेदवार उद्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहे. विरोधकांनी जर उमेदवार रिंगणात उतरवला तर अध्यक्षपदाची निवडणूक होईल.दरम्यान राहुल नार्वेकर यांना अध्यक्ष पद मिळाल्यास विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद होईल
. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेसच्या नाना पटोले यांनी अध्यक्षपदी काम केलं. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडं अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार २०२२ मध्ये सत्तेवर आल्यानंतर राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदावर निवड झाली होती.दरम्यान आज अधिवेशनात विधानसभेचे हंगामी अध्यक्षपदी असलेले कोळंबकर यांनी विधानसभेवर निवड झालेल्या राज्यातील नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ दिली. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, मुनगंटीवार यांनी ही चर्चा कुणी सुरू केली त्याचं नाव सांगा, माझं नाव या चर्चेत नाही अशी माहिती समोर आली.
दरम्यान विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर विधानसभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले कालिदास कोळंबकर यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली.