राजमुद्रा : राज्यात पुन्हा एकदा महायुतीला सत्तेवर आणण्यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” गेमचेंजर ठरली.. या निवडणुकीत लाडक्या बहिणीनीं भरभरून मतदान केलं. महायुतीच्या या विजयानंतर आता सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार 2100 रुपये डिसेंबर महिन्याचे कधी येणार याच लाडक्या बहिणींना वेध लागले आहेत. मात्र दुसरीकडेराज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या अर्जांच्या छाननीला महिला आणि बालविकास विभागाने प्रारंभ केला आहे. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ४८.३ लाख लाभार्थी असून, निकषांच्या आधारे यापैकी एक ते दोन टक्के महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. यामध्ये खानदेशातील जळगाव,धुळे, नंदुरबार जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील महिलाही या लाभापासून वंचित राहू शकतात..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विभागात सद्यस्थितीत सुमारे ४८ लाख लाभार्थी आहेत. नाशिकमध्ये १५.८ लाख लाभार्थी असून, अहिल्यानगरमध्ये १२.४ लाख, तर जळगावात १०.४ लाख लाभार्थी आहेत. धुळ्यात ५.४ लाख आणि नंदुरबारमध्ये ४.३ लाख लाभार्थी आहेत. यापैकी तूर्तास एक टक्का महिलांच्या अर्जांची छाननी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची चिंता ही वाढली आहे.
या लाडक्या बहिणी योजनेच्या अर्जाच्या छाननी मध्ये असे लक्षात आले की एका कुटुंबात दोनहून अधिक महिलांनी लाभ घेतला असल्यास, कुटुंबातील सदस्यांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक असल्यास, कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास अशा लाभार्थी महिलांना लाभ देण्याबाबत पुनर्विचार होऊ शकतो असे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे पैसे येणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे..दरम्यान महिला व बालकल्याण विभागाकडून हमीपत्रावरील स्वाक्षऱ्यांची जुळवाजुळव न होणे, स्वाक्षरीच नसणे, अर्जामध्ये दाखल केलेले आधार क्रमांक आणि सादर केलेली फोटोकॉपी न जुळणे, उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लाभार्थीच्या अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै ते नोव्हेंबरचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून आता डिसेंबर महिन्याचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसात मिळणार अशी ही माहिती समोर आली आहे.