जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |महापालिकेत भाजपाकडून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांच्या पाठीशी शिवसेना संपूर्णपणे १००% ताकदीनिशी उभी आहे. त्यांनी न डगमगता ठाम राहावे. या प्रकरणातील तांत्रिक बाबी तपासल्या जातील तोपर्यंत घाबरण्याचे काहीही कारण नाही. अशी माहिती रावेर लोकसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी दिली.
मनपाच्या प्रशस्त सतरा मजली इमारतीत उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या कार्यालयात आयोजित बंडखोर नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना पारकर म्हणाले ‘राज्याचे नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे प्रथमच जळगाव शहरात येत आहेत. त्यानिमित्त ते महापालिकेत येणार असून बारा वाजता त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची आढावा बैठक घेतली जाणार आहे.’ असे सांगून पारकर म्हणाले या बैठकीत नगरसेवकांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेण्यात येतील.
शिवसेनेत कुठल्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण नाही. सर्व नगरसेवक एकजुटीने उभे आहेत. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर उपमहापौर भुषण पाटील म्हणाले ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपर्क प्रमुख संजय सावंत, ना. एकनाथ शिंदे यांची महापौर आणि आपण भेट घेतली होती. त्या वेळी ना. एकनाथ शिंदे यांना जळगाव येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार ते उद्या महापालिकेत येणार आहेत.’
आमचा गटनेता ऍड दिलीप पोकळे
उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले की गटनेत्यांची निवड ही लोकशाही पद्धतीने झाली आहे. ५७ पैकी २९ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या उपस्थितीत आम्ही गटनेते म्हणून ऍड. दिलीप पोकळे यांची निवड केली आहे. आता पालिकेचे कामकाज त्यांच्या माध्यमातून चालणार असल्याचा निर्णयही त्यांनी सांगितला. गटनेत्या संबंधी आणि भाजपमधून आलेल्या नगरसेवकांबद्दल चुकीच्या वावड्या उठत आहेत. त्याला शिवसैनिकांनी थारा देऊ नये असेही त्यांनी सांगितले. कारण अपात्रतेचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ आहे. याचा निकाल लागल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.
यावेळी नगरसेवक चेतन सनकत, ऍड दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, सुरेश सोनवणे, बाळासाहेब चव्हाण, सचिन पाटील, उत्तम शिंदे, हाफिज शेख, पार्वताताई भिल, सुनील महाजन, गजानन महापुरे आदी उपस्थित होते.