जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत सत्तांतर घडून आतापर्यंत भाजपाच्या ताब्यात असलेली महानगरपालिका शिवसेनेकडे गेली आहे. त्यामुळे भाजपा गटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. मनपावर शिवसेनेचेची सत्ता आली. महापौर जयश्री महाजन विराजमान झाल्या. तर बंडखोरांचे वर्चस्व कायम राहिल्याने पालिकेच्या वर्तुळात पुन्हा एकदा धुमश्चक्री उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता लक्ष मनपा स्थायी समितीकडे लागले असून स्थायी समिती सभापती पद यामुळे धोक्यात आले असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सत्तांतर झाल्यानंतर अनेक महत्त्वाची पदे शिवसेनेकडे चालून आली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना भाजपमधून मोठ्या संख्येने नगरसेवक बाहेर पडल्यामुळे सध्या त्यांची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. या सर्व बाबींवर शिवसेना कशा पद्धतीने मात करते याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे.
पालिकेच्या राजकारणात सर्वात महत्त्वाचा व आर्थिक दुवा साधणारा घटक म्हणून स्थायी समितीकडे पाहिले जाते. तिच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शहराच्या विकासापासून तर लहान-मोठ्या निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. त्याची सूत्रे आपल्या ताब्यात असावी असे शिवसेनेच्या काही नगरसेवकांना वाटत असल्यामुळे, त्यांनी स्थायी सभा सभापती यांना कमी करून त्याऐवजी त्या जागेवर सेनेचा पदाधिकारी आपल्या मर्जीतील नगरसेवकाची वर्णी लागावी म्हणून वरीष्ठ नेत्यांकडे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेकडे स्थायी समिती सभापतीचे पद धावून येणार आहे का? याकडे लक्ष लागून आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
काही सदस्यांनी आपल्या मर्जीतील सभापती असावा म्हणून वरिष्ठ नेत्यांकडे गळ घातली आहे. दरम्यान नवीन सभापती पदासाठी शिवसेनेत अनेक जण इच्छुक असून त्यांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. हे पद आपल्याच पदरात पडावे, आपल्या मर्जीतील सभापती असावा यासाठी काहीजण प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.