जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते ना. एकनाथ शिंदे यांनी आज अचानक जळगाव महापालिकेत भेट न दिल्यामुळे विविध राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मनपा मधील भेटीचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे उपस्थित शिवसैनिक, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वेळेअभावी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे; परंतु या मागील खरे राजकारण काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव महापालिकेत आज दुपारी साडेबारा वाजता नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे भेट देणार होते. त्यांच्या उपस्थितीत भाजपमधून शिवसेनेत आलेल्या बंडखोर नगरसेवकांची आढावा बैठक व इतर भेटीगाठी, समस्या ऐकून घेणे आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता. त्यादृष्टीने मनपा प्रशासन यांच्यासह पालिकेतील शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यांनी जोरात तयारी करून ठेवली होती. त्यांच्या स्वागतासाठी पालिकेच्या आवारात भव्य रांगोळी काढण्यात आली होती. संपूर्ण परिसर भगवे झेंडे आणि कमानी उभारून सजविण्यात आला होता. ढोल ताशाच्या निनादात कार्यकर्त्यांचे उधाण सुरू होते. तसेच शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्या स्वागतासाठी एका तासापासून आवारात उभ्या होत्या. परंतु अचानक ना. शिंदे येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
दरम्यान ना. शिंदे यांच्या स्वागतासाठी दोन-तीन तासापासून जय्यत तयारी करण्यात आली होती. पालिकेचे कर्मचारी, अधिकारी, आयुक्त यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी प्रतीक्षेत होते. मात्र ना. शिंदे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले. महापालिका आवारात शिवसेनेचे नेते नितीन लढा, नगरसेवक डॉ. सुनील महाजन यांच्यासह बंडखोर नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.