राजमुद्रा : महायुती सरकारच्या राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारानंतर आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.. या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणी सरकारविरोधात विधान भवनाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. खुन्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या प्रकरणावर सत्ताधाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकालात महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात होता.. आता या ईव्हीएममुळे निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. असा सणसणीत टोला आघाडीने लगावला.. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलित बांधवांवर अत्याचार केले. सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा युती सरकारला लोकांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
या अधिवेशनावेळी सभागृहाचे कामकाज सुरु होताच नाना पटोले यांनी परभणीतील पोलीस अत्याचाराचा व दलित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी परभणीत जे कोंबिग ऑपरेशन केले ते शासन निर्मित होते का, यासह या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे त्यासाठी स्थगन प्रस्ताव दिला आहे. या विषयावर बुधवारी चर्चा करु असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला.
या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा दुरुपयोग केला जात आहे. ईव्हीएम मशीन बनवण्याच्या कंपनीत भाजपाचे लोक संचालक मंडळावर आहेत. निवडणूक आयोगाला असलेले संवैधानिक अधिकाराचा वापरही ते करू शकत नाहीत सर्व कारभार भाजपाच्या इशाऱ्यावर सुरु आहे असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला. राज्यातील विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांना चांगलंच त्यांनी धारेवर धरल आहे.