जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेच्या विविध गाळेधारकांचा प्रश्न सोडवण्यासाठी आज गाळेधारक एकजुटीने राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महापालिकेत भेट घेणार होते. परंतु अचानक एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे सर्व गाळेधारकांची हिरमोड झाली आहे. गाळेधारकांमध्ये यामुळे मोठी नाराजी पसरली आहे.
अनेक दिवसांपासून गाळेधारक संघटना आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देत आहेत. गाळेधारकांतर्फे विविध आंदोलनेही करण्यात आली. परंतु त्यांचा प्रश्न ‘जैसे थे’ असून या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधावे म्हणून आज जळगाव महापालिकेच्या आवारात त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी गाळेधारक संघटनेचे कार्यकर्ते युवराज वाघ म्हणाले, ‘गाळेधारकांचा प्रश्न प्रलंबित असून गाळेधारकांवर अनेक दिवसांपासून उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. पालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात दंड लावून त्यांच्यावर अन्याय केला आहे. अनेक वर्षापासून गाळेधारकांच्या माध्यमातून ते व्यवसाय करीत आहेत.’ यावेळी विविध व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी घोषणा देऊन आंदोलन देखील केले. परंतु ऐनवेळी एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे गाळेधारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी काही गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, राजेश कोतवाल, युवराज वाघ आदी उपस्थित होते.