जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिका काम करेल ते गुणवत्तेवर आधारित असले पाहिजे याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. तसेच सर्वसामान्य जनतेचे लोकहित विषयांना प्राधान्य द्यावे असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जळगाव मनपाच्या सतरा मजली इमारतीमध्ये सभागृहात आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, आ. चंद्रकांत पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी ना. एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करू. सर्वात प्रथम शहरातील रस्ते गुळगुळीत व चांगले झाले पाहिजे. त्यासाठी अधिक निधी देण्यात येईल असे सांगून ना. शिंदे म्हणाले, लवकरच सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या निधीबाबत राज्याचे प्रधान सचिव यांच्या सोबत बैठक घेऊन जे प्रश्न तातडीने सोडवता येतील त्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून जळगाव जिल्ह्यातील विविध नगरपालिकेच्या समस्या आणि आर्थिक प्रश्न मांडले. जिल्हा नियोजन मंडळातून जळगाव पालिकेला ६१ कोटी रु चा निधी दिला असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी जळगाव मेहरून तलाव उद्यान सुशोभीकरण करण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले. यावेळी भाजपमधून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या अडचणींबाबत योग्य तो निर्णय घेतला घेतला जाईल असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले.