राजमुद्रा : आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जोमाने तयारीला लागला असताना आता या निवडणुकीपूर्वीच छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे.. गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असलेले छत्रपती संभाजी नगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेल हे त्यांच्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे..
आगामी मनपा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. नुकतेच माजी महापौर नंदकुमार घोडेल हे धनुष्यबाण हाती घेणार असून याबाबत त्यांची वरिष्ठांशी चर्चा ही झाली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले. त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील उद्धव सेनेला एकही जागा मिळवता आली नाही. त्यानंतर आता तीस वर्षे शिवसेनेत राहिलेले घोडेल हे सुद्धा आता ठाकरे गटाला रामराम करणार आहेत..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा ठाकरे गटांच्या नेत्यांना जिव्हारी लागला आहे..राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यामुळे ठाकरे गटातील अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. अनेक नगरसेवक हे शिंदेंची शिवसेना किंवा भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशातच आता महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना माजी महापौर व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे नंदकुमार घोडेले हे देखील शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे..