जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यात सर्वदूर राष्ट्रीय महामार्ग तथा राज्य महामार्गाची कामे सुरु आहेत तर बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. रस्ते गुळगुळीत व खड्डेविरहीत झाल्यामुळे बऱ्याचदा वाहनचालकांना वेग वाढविण्याचा मोह आवरत नाही. वाहनचालकांनी वेग मर्यादेचे भान ठेवून व स्वत:चे वाहन नियंत्रणात ठेवून अशा रस्त्यांवर वाहन चालविणे ही काळाची गरज असून पावसाळ्यात वाहन चालवितांना आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे असे आवाहन उपप्रादेशिक परीवहन अधिकारी शाम लोही यांनी केले.
नागरीकांनी शक्यतो पावसाळयात अनावश्यक प्रवास टाळावा, पावसाळयात अनेक अडचणी येत असल्याने प्रवासाचा कालावधी वाढून पोहोचण्याची वेळही वाढते. त्यामुळे वाहन चालवितांना घाई होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. जेव्हा खराब हवामान असते तेव्हा रस्त्यावर चिन्हाद्वारे दर्शविण्यात आलेली वेग मर्यादा ही धोकादायक ठरु शकते. पहिल्या पावसात रस्त्यावर सांडलेले गाडीचे तेल, डिझेल, ग्रीस व इतर स्निग्ध पदार्थांमुळे रस्ता निसरडा होत असतो. यामुळे वाहनांच्या चाकांची रस्त्याबरोबर आवश्यक असणारी पक्कड कमी होते व वाहन घसरण्याची शक्यता असते.
खराब हवामानात दोन वाहनांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे. यामुळे इतर वाहन चालकांना त्यांचे वाहन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे अंतर मिळेल. खराब हवामानात जी अडचण तुम्हास भेडसावते त्याच अडचणी तुमच्या पुढील अथवा मागच्या वाहनचालकास भेडसावतात, यासाठी दोन वाहनांमध्ये तीन सेकंदाऐवजी सहा सेकंदाचे अंतर ठेवा.
रस्त्यावरुन पाणी वाहत असेल तर वाहन त्यामधून चालवू नका. अन्यथा पाण्याच्या प्रवाहामुळे आपले वाहन वाहून जावू शकते. आपल्या वाहनाचे दिवे सुस्थितीत असल्याची खात्री करा. पावसाळयात धुक्यामुळे तसेच सुर्यप्रकाश कमी असल्यामुळे दूरपर्यत दिसत नाही. जसे आपणास दिसत नाही तसेच इतर वाहन चालकांना देखील दिसत नाही याचेही भान आपणास असणे आवश्यक आहे.
वाहनाच्या यांत्रिक स्थितीबाबत थोडी जरी शंका आल्यास ताबडतोब आपले वाहन कंपनीच्या अधिकृत दुरुस्ती केंद्रात पाठवावे. कंपनीने विहित केल्याप्रमाणे दर दहा अथवा पंधरा हजार कि.मी प्रवास केल्यानंतर वाहनाचे सर्व्हिसिंग करुन घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी म्हटले आहे.