धुळे राजमुद्रा वृत्तसेवा | धुळे शहरात बऱ्याच दिवसापासून तेली समाजाचे एक स्वत : चे मोठे समाज भवन असावे अशी भावना होती. या उद्देशाने धुळे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास काळू चौधरी यांनी आपल्या स्वमालकी सुमारे एक एकर जागा तेली समाज युवा आघाडीचे प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी यांच्याकडे कोणताही मोबदला न घेता विनामुल्य देऊ केली.
तेली समाजाच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले, समन्वयक सुनिल चौधरी, युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष युवराज करनकाळ, मजूर फेडरेशनचे माजी सभापती राजेंद्र महाले, सतिष महाले, शशिकांत चौधरी, अनिल अहिरराव, हॉटेल शितलचे मालक मोतीलाल चौधरी, सेवा आघाडीचे सुभाष जाधव, वि.अध्यक्ष संजय चौधरी, गिरीश चौधरी, रमेश करनकाळ, खान्देश मंडळ अध्यक्ष कैलास चौधरी, रविंद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरची घोषणा कैलास काळू चौधरी यांनी केली.
यावेळी कैलास चौधरी म्हणाले की, मी माझ्या मालकीची वडेल रस्त्यांवरील एक एकर जमीन तेली समाज भवनासाठी युवा आघाडी प्रदेश महासचिव, तेली समाजाचे उदयोन्मुख युवा नेतृत्व नरेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून समाजासाठी विनामुल्य त्यांच्याकडे सपुर्द करेन. त्यांनी तेली समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून सर्व सोयींनी युक्त भव्य समाज भवन उभारावे त्याकरिता आणखी काही मदत लागल्यास किंवा जागा कमी पडल्यास मी देण्यास तयार आहे. मला खात्री आहे की, नरेंद्र चौधरी अत्यंत पारदर्शीपणे समाज भवन उभारतील. त्याकामी आम्ही सर्व त्यांच्या सोबत तनमनधनाने खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली .
यावेळी युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी म्हणाले की, कैलासभाऊ चौधरी यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली असून आम्ही निश्चीत त्यांच्या संकल्पनेप्रमाणे भव्यदिव्य समाज भवन पारदर्शकपणे काम करून उभारु व या समाजभवनाचे नाव कोण्या एका व्यक्तीच्या नावे नव्हे तर आपले आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज भवन या नावाने तयार केले जाईल. यासाठी लवकरच तेली समाजातील एक सर्वसमावेशक समिती तयार करण्यात येईल. सर्व लहान थोर व्यक्तींच्या सुचनांचा आदर केला जाईल. याठिकाणी देणगी देणाऱ्या देणगीदारांचा उचित सन्मान केला जावून सर्वांना सारखाच मान सन्मान राखला जाईल. याकामी सर्वच स्तरातील बंधु – भगिनींनी आपआपल्या परिने योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्रातील तेली समाजाचे एक आदर्श भवन निर्माण करु असा संकल्प नरेंद्र चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला.