राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या वर फोडत असताना आता महाविकास आघाडी पुढे टिकणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आगामी होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरें गटाने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत..अशातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल दीड तास खलबत झाल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे या भेटीत काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे..
नुकतीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.. येत्या 25 जानेवारी रोजी मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा निघणार आहे.या मोर्चामध्ये महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय असणार? मोर्चामध्ये कशाप्रकारे सहभागी होणार? याबाबतीत ही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.