धुळे राजमुद्रा वृत्तसेवा | शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबध्द असून शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी दूर कराव्यात. तसेच पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीत योजनांचे लाभ मिळवून द्यावेत, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी दिले. कृषी विभागातर्फे सोंडले, ता. शिंदखेडा येथे रिसोर्स बँक शेतकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा, पीक पाहणी आणि अधिकारी व कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, शिरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक एस. डी. मालपुरे, शिंदखेड्याचे तहसीलदार सुनील सैंदाणे, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे (शिंदखेडा), जी. के. चौधरी (धुळे), सोंडलेच्या सरपंच मंगलबाई पवार आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री भुसे यांच्या हस्ते पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी कृषी मंत्री भुसे यांनी सरवड शिवारात भेट देवून पीक पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी श्यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे, उपविभागीय अधिकारी डॉ. बांदल, तहसीलदार सैंदाणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.