(राजमुद्रा वृत्तसेवा) कोरोनाच्या उपचार पद्धतीत दिल्या जाणाऱ्या स्टेरॉईडमुळे होणारा म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा उपचार हा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्याची मागणी माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाला केली आहे.
कोरोनाचा उपचार करताना देण्यात येणाऱ्या स्टेरॉईडमुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. या आजारात नाकावाटे ही बुरशी डोळे व नंतर मेंदूपर्यंत पोहोचून आपला गंभीर परिणाम दाखवते. या आजारावर वेळीच उपचार केल्यास हा आजार बरा होतो. मात्र या उपचारासाठी लागणारे एम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन 40 ते 45 हजार किमतीची असल्याने सर्वसामान्य गरीब कुटुंबाला ही उपचार पद्धती न परवडण्यासारखी आहे.
याबाबतीत उपाय म्हणून या इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्यात यावे व किंमतही परवडण्यासारखी ठेवण्यात यावी अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी राज्यपाल, आरोग्य मंत्री, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
पहिल्या लाटेच्या प्रमाणात दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढले असून वेळीच उपचार न केल्यास मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च जवळजवळ दोन लाखांपर्यंत असल्याने ही मागणी करण्यात आल्याचे लक्षात येते.