पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा | आगामी निवडणुकीत वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वांनी संपर्क अभियानाच्या माध्यमातून संघटना मजबूत केली पाहिजे. त्यासाठी आतापासून व्यापक दृष्टीकोनाचे नियोजन सर्वांनी करणे आवश्यक असल्याचे मत आ. चिमणराव पाटील यांनी पारोळा येथे व्यक्त केले.
पारोळ्यात शिवसेनेचे संपर्क अभियान निमित्त आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल माने आदी उपस्थित होते. आ. चिमणराव पाटील म्हणाले, राज्यात तीन पक्षाचे आघाडी सरकार आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या माध्यमातून राज्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मिळाल्यामुळे देशाच्या राजकारणाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी चमत्कार घडवून नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या तीन वर्षापासून आघाडीचे सरकार असल्याने सर्वसामान्य जनतेच्या ग्रामीण भागात अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी संघटना मजबूत होणे आवश्यक आहे असे सांगून आ. चिमणराव पाटील यांनी भविष्यात चुका टाळाव्यात त्यामुळे शिवसेना वाढीला मर्यादा येणार नाहीत असे सांगितले. आगामी निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सत्ता ताब्यात घेण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वांना समान न्याय देणे आवश्यक असून त्यादृष्टीने नियोजन झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.