फैजपूर राजमुद्रा वृत्तसेवा | फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या विषयाला नुकत्याच झालेल्या ऑनलाइन सभेत मंजुरी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून कारखाना बंद असल्याने कामगारांची देणी थकली असून संचित तोट्यात सातत्याने वाढ होत असल्याने या संदर्भात एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सगळे प्रयत्न करणार असल्याची माहिती आ. शिरीष चौधरी यांनी याप्रसंगी दिली. अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते. काही सभासदांनी ऑनलाइन सभेतील चर्चेत सहभाग नोंदवत आजही मधुकर साखर कारखान्यावर विश्वास असल्याचे सांगत आता ऊस लावून ठेवला असून भूतकाळाचा विचार न करता वर्तमानाचा विचार करून कारखाना सुरू करा व शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल करावे अशी भावना व्यक्त केली आहे. ऑनलाइन सभेत विषयपत्रिकेवरील सर्व दहा विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. चेअरमन शरद महाजन व संचालक नरेंद्र नारखेडे यांनी कारखाना विषयी माहिती देताना सांगितले की, दोन वर्षापासून कारखाना बंद आहे. त्यामुळे प्रचंड आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची एफ. आर. पी. सी. रक्कम व अन्य देणी थकली आहे. त्यात दोन वर्षापासून निसर्गाचाही असहकार आहे. त्यामुळे संचित तोटा १०३ कोटींवर जाऊन पोचला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भाडेतत्त्वावर कारखाना देण्याचा निर्णय घेतला आहे असेही ते म्हणाले.
शरद महाजन व आमचा पक्ष वेगळा असला तरी आमच्यात कुठलाच बेबनाव अथवा मतभेद नाहीत असे आमदार शिरीष चौधरी यांनी सुरुवातीला स्पष्ट केले. पक्ष वेगळा असला तरी कारखान्याचे हितासाठी आम्ही एकत्र आहोत. केंद्र सरकारने सहकार विभाग सुरू केला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असेही आमदार चौधरी म्हणाले. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा बँक संचालक गणेश नेहते, कामगार युनियन अध्यक्ष किरण चौधरी, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, कार्यकारी संचालक शंकर पिसाळ, प्रभारी मुख्य लेखाधिकारी रत्नदिप वायकोळे, व्हाईस चेअरमन भागवत पाटील आदी उपस्थित होते.