जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर पालिकेच्या १७ मजली इमारतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला. महापौरपदी जयश्री महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील हे विराजमान झाले. त्यानंतर शिवसेनेने भाजपाला धक्कातंत्र देण्याची मोहीम सुरू केली. मनपाच्या आज झालेल्या विविध चार प्रभाग समित्यांवर बंडखोरांचे वर्चस्व राहिले असल्याचे दिसून आले आहे. हा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
प्रभाग क्रमांक एक साठी सचिन पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बिनविरोध निवड केल्याची घोषणा केली या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड नगरसचिव अनिल गोराने उपस्थित होते त्यानंतर प्रभाग समिती दोन ते चार ची प्रक्रिया सुरू झाली
प्रभाग समिती क्रमांक दोन मध्ये प्रवीण कोल्हे विजयी झाले. त्यांना १३ मते तर त्यांचे विरोधक मुकुंद सोनावणे यांना ७ मते पडली. प्रभाग समिती क्रमांक तीन मध्ये रेखा चुडामण पाटील विजयी झाल्या. त्यांन १० तर त्यांचे विरोधक धीरज सोनावणे यांना ९ मते पडली. प्रभाग समिती क्रमांक चार मध्ये शेख हसीनाबी शेख शरीफ हे विजयी झाले. त्यांना १० तर त्यांचे विरोधक उषा संतोष पाटील यांना ६ मते मिळाली. या निवडणुकीत भाजप मधून शिवसेनेला मतदान करणाऱ्या बंडखोरांचे वर्चस्व दिसून आले. निवडीनंतर चारही नवनिर्वाचित सभापतींचा महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पालिकेच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.