रावेर राजमुद्रा वृत्तसेवा (जयंत भागवत) नकली नोटांच्या रॅकेट प्रकरणी मुख्य संशयितासह या नोटांना चलनात वापरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रावेर येथील पाच जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे . याबाबत वृत्त असे की , मध्यप्रदेशातील नकली नोटांच्या रॅकेटचे धागेदोरे हे रावेरशी जुळले असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच समोर आली होती . एमपीमध्ये एकाला अटक करण्यात आल्यानंतर याबाबती माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती . यामुळे मध्यप्रदेशातून संबंधीत आरोपीची चौकशी करण्यात आली . यानंतर त्याच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे .
या संदर्भात आज पहाटे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , रावेर येथील शेख शाकीर शेख हाफीज याने मध्यप्रदेशातून सात हजार रूपयांच्या १००
आणि २०० रूपयांच्या बनावट नोटा रावेरात आणल्या होत्या . त्याने या नोटा असलम उर्फ राजू सुपडू तडवी ( वय ३० राहणार पाच बीबी टेकडी रावेर ), सोनू मदन हरदे ( वय ३० राहणारा अफुल्ली रावेर ), रविंद्र राजाराम प्रजापति ( वय ३१ राहणार कुंभार वाडा रावेर ) आणि शेख शाकीर शेख साबीर ( वय २६ राहणार खाटीक वाडा रावेर ) यांना वापरण्यासाठी दिल्या होत्या . यातील शेख शाकीर शेख हाफीज याला मध्यप्रदेशात हरदा येथून अटक करण्यात आली असून त्याचे हस्तांतरण करण्यात आले आहे . त्याची चौकशी केल्यानंतर वरील चारही जणांना अटक करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्थानकात भादंवि कलम ४८ ९ , ( ब ) , ४८ ९ ( क ) ,३४ प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार / २३६० शेख गफुर शेख कादर व पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे करत आहेत .