(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांच्या तुलनेत शासकीय गोदामामधून जळगाव तालुक्यात सर्वात कमी रेशन दुकानदारांनी रेशनच्या धान्याची उचल केली आहे. ११ जुलै अखेर तालुक्यातील एकूण २०५ रेशन दुकानदारांच्या २०.४९% रेशन दुकानदारांनी धान्य उचल केले आहे.
जळगाव तालुक्यातील गोदामामधून ११ जुलै अखेरपर्यंत केवळ ४२ रेशन दुकानदारांनी धान्य उचल केली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांच्या वर तर बोदवड व भडगाव तालुक्यात १०० टक्के रेशन दुकानदारांना गोदामातून धान्य पोहोच करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार जळगाव तालुक्यात एकूण २०५ रेशन दुकानदार आहेत. त्यापैकी पुरवठा विभागाकडून १८९ रेशन दुकानदारांना धान्य मंजूर करण्यात आले. त्यापैकी १०७ दुकानदारांनी शासकीय गोदामामधून रेशनचे धान्य मिळवण्यासाठी चलन भरले होते. त्यांना गोदामात परमिट ही देण्यात आले आहे. त्यापैकी ४२ रेशन दुकानदारांना धान्य पोहोच करण्यात आले आहे.
जामनेर ६५.५२, भुसावळ ५१.६१, बोदवड १००, कुऱ्हे ५०, मुक्ताईनगर ६८.६३, यावल ७२.५८, रावेर ९७.९४, सावदा ९४.२३, एरंडोल ५८.८३, धरणगाव ५१.८९, पारोळा ७७.५२, अमळनेर ९१.८५, चोपडा ३६.७२, पाचोरा ७०.७१, भडगाव १००, चाळीसगाव ९५.९२ याप्रमाणे तालुक्यांची स्थिती आहे.