(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात आहे. मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे समर्थक देखील नाराज झाले असून मुंडे समर्थकांनी याचा निषेध म्हणून राजीनामे द्यायलाही सुरु केली आहेत. या पार्श्वभूमीवर काल त्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठांची भेट घेतली. त्यानंतर आज त्या मुंबईत परतल्या असून यावेळी त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.
यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही. राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्याचे राजीनामे नामंजूर केले. माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले. तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू, असं त्या म्हणाल्या. मला दबावतंत्र करायचं नाही. मी काल दिल्लीला गेले होते. संघटनेच्या कामासाठी गेले होते. मला कुणीही झापलं नाही. अत्यंत सन्मानाची वागणूक पंतप्रधान मोदी, अध्यक्ष नड्डा यांच्याकडून मिळाली. कार्यकर्त्यांनी नाराजी दूर कराल असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. मोठा नेता नेहमीच त्याग करतो असंही त्या म्हणाल्या. जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुध्द टाळायचा प्रयत्न करणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी कुणालाही घाबरत नाही. निर्भिड राजकारणाचे संस्कार माझ्यावर आहेत, असंही त्या म्हणाल्या.