(राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यशासनाच्या कडक निर्बंधांचे पालन करण्यास नागरिक साथ देत नसल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसुन येत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती, वाशीम मध्ये दुपारी 12 वाजेपासून तर अकोला सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री 12 वाजेपासून 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
या जिल्हास्तरीय लॉकडाऊनच्या काळामध्ये दवाखाने, मेडिकल इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालयांसह सर्व व्यवहार बंद राहतील. किराणा विक्री, खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळे आदींच्या विक्रीला सात ते अकरा या वेळेत सूट देण्यात आली असून बार, रेस्टॉरंट, हॉटेल यांना संध्याकाळी आठ वाजेपर्यंत होम डिलिव्हरीची मान्यता देण्यात आली आहे. लॉकडाऊन लागण्यापूर्वी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचे चित्र सकाळपासून दिसत होते. वाशीम अमरावती मध्ये दुपारपासून लॉकडाऊन लागू झाले असून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक शासन केले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिक राज्य शासनाच्या कडक निर्बंधांचे पालन करत नसल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची वाढती संख्या पाहता हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गोव्यातही 9 मे ते 25 मे पर्यंत संचारबंदी लावण्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.