(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शिवसेनेचे ज्येष्ठ आ. चिमणराव पाटील आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची पारोळा येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात जोरदार राजकीय जुगलबंदी रंगली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत चांगलीच राजकीय चर्चा झाली. दरम्यान मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात माध्यमांवर टीकेचा चौफेर हल्ला करत सांगितले की, ‘कोणाचे काहीतरी ऐकून नेत्यांमध्ये गैरसमज पसरला आहे. माध्यमांनी कुठलेही उत्तर देताना याची शहानिशा केली पाहिजे. अन्यथा वेळप्रसंगी त्यांना शिवसेना स्टाईल घेण्यात येईल’ असा इशारा त्यांनी दिला. माध्यमांवर झालेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पुन्हा शिवसेनेत सुरू असलेली अंतर्गत धुसफूस उघडकीस आली आहे. आपल्या तीस मिनिटाच्या आवेशपूर्ण भाषणात ‘गुलाबराव पाटील घसरले की काय?’ असे बोलले जात आहे. जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी आपण रक्ताचे पाणी केले, तेव्हा संघटना उभी राहिली. मात्र आज काही ‘ऐरे गैरे नथ्थू खैरे’ उघडपणे बोलू लागले आहेत की, ‘आमच्या तालुक्याला पालकमंत्र्यांनी काय दिले?’ त्यांना सांगू इच्छितो असे सांगून गुलाबराव पाटील आक्रमक पणे म्हणाले. “होय शिवसेनेत भांडण आहे. अनेक पक्षात भांडणे असतात. या भांडणामुळे आपण मोठे झालो याची जाणीव त्यांनी ठेवावी. त्याग करून मोठ्या कष्टाने शिवसेना जिल्ह्यात उभी राहिली आहे याचे भान आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. कारण त्या काळातही आम्ही मोटरसायकलवर शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या आहेत. परंतु शिवसेनेचा भगवा खांद्यावरच धरून राहिला. त्या काळातही मजबुतीने ठामपणे शिवसेनेसोबत होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईमुळे आपण सेनेत मोठे झालो आहोत. चार वेळा आमदार, जिल्हा परिषद सभापती पासून ते शिवसेनेचा उपनेता अशी विविध पदे त्यांनी दिली. याची जाणीव आपल्याला आहे”, असेही ते म्हणाले.
‘शिवसैनिकांमध्ये काहीतरी कोणाच्या सांगण्यावरून गैरसमज झाले आहेत. कोणी काही कानात सांगतो परंतु त्याची खातरजमा करा. गैरसमजावर जाऊ नका असा सल्ला देत गुलाबराव पाटील म्हणाले, माध्यमांनी देखील अश्या किरकोळ गोष्टींना थारा न देता ‘सत्य काय’ याची वस्तुस्थिती मांडली पाहिजे. कार्यकर्त्यांना शासकीय समित्यांवर घेण्यात आले. परंतु प्रत्येक आमदाराकडून त्यांच्या नावांची यादी मागवण्यात आली. ज्या आमदारांनी यादी दिली त्यानुसार नावे घेण्यात आली आहेत. शासकीय कमिट्यांवर नावे देण्यासाठी सरकारने कोटा ठरवून दिला आहे. त्या कोट्या नुसार आपल्या हिस्यात असलेल्या जागा देण्याचे ठरले आहे. परंतु याचाही काही लोकांनी बागुलबुवा केला. पालकमंत्र्यांच्या संदर्भात बदनामी करणारे काही आपलेच लोक आहेत असेही ते म्हणाले. आमदार चिमणराव पाटील आणि माझ्यात काहीतरी मोठे मतभेद आहेत असा कांगावा निर्माण केला जातो. परंतु तसे काही नाही. मात्र काही किरकोळ गोष्टी असल्या तरी त्याचा चुकीचा अर्थ काढणे योग्य नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. आपल्या तीस मिनिटाच्या आवेशपूर्ण भाषणात गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना चुकीची माहिती देणाऱ्या आणि बदनामी करणाऱ्यांचा समाचार घेतला.