जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक या पदावर आर. एम. पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली असून यापूर्वी आर. एम. पाटिल हे जळगाव येथे नगररचनाकार पदावर कार्यरत असतांना त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरलेली होती. त्यानुषंगाने छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी त्यांच्या या नियुक्तीवर आक्षेप घेतला असून त्यांच्या नियुक्तीच्या चौकशीची मागणी केली आहे.
यापूर्वी असलेल्या नियुक्तीच्या ठिकाणीही त्यांच्या विषयी गंभीर आरोप असल्याचे पत्रक कोल्हे यांनी प्रसिध्द केले आहे. यांची चौकशी देखील सुरु आहे. अशा परिस्थितीत त्यांना जळगाव जिल्ह्याचा कार्यभार सोपविण्यात आला असून, जळगाव महानगरपालिका नगररचनाकार या पदाचा देखील चार्ज देण्यात आलेला आहे.
पदाधिकाऱ्यांकडुन वारंवार नगरविकास विभागास या बाबींची जाणीव करून दिलेली असतांना सुध्दा नगरविकास विभागातील अधिकारी हे अशा प्रकारच्या गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक जळगाव शहरात करून काय साध्य करू ईच्छितात? असा सवालही अमोल कोल्हे यांनी केला आहे.
तरी आर. एम. पाटील यांच्या नियुक्तीची सखोल चौकशी करण्यात यावी असे निवेदन छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले असुन, त्याची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी जळगाव, प्रधान सचिव, ( न.वि. 1 ) नगरविकास विभाग, मुंबई, संचालक , नगररचना विभाग, पुणे यांना पाठवली आहे .