पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात गाजावाजा झालेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळा प्रकरणी आज पुणे न्यायालयाने याप्रकरणातील संशयित आरोपी ११ जणांचे जामीन अर्ज मंजूर केले आहेत. दरम्यान एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलकावर तसेच पावत्या माचींग केल्याच्या 20% रक्कम दहा दिवसांच्या आत भरण्यासह इतर अटी न्यायालयाने संशयितांना घातल्या आहेत.
बीएचआर घोटाळ्यात मागील महिन्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यातील विविध भागात धाडसत्र टाकून ११ संशयित आरोपींना अटक केली होती. या सर्वांच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालयात काही दिवसांपासून सुनावणी सुरु होती. सर्व आरोपींनी त्यांच्याकडे पावत्या माचींग केल्याची निघणारी अपहाराची रक्कम न्यायालयात भरण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र सदर केले होते. त्यानुसार न्यायालयाने आज सर्व आरोपींना त्यांच्याकडे निघणाऱ्या रकमेची माहिती देत १० दिवसांच्या आत यातील 20% रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुढील 20% रक्कम ऑक्टोबर महिन्यात त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस संशयितांकडे आणखी किती रक्कम थकबाकी म्हणून दिसत आहे, त्याचा हिशोब करण्याची जबाबदारी सरकारी पक्ष आणि विद्यमान भाऊसाहेब काकडे न्यायालयाने संबंधितांकडे सोपवली आहे.
ऑक्टोबर अखेरीस हिशोब झाल्यानंतर पैसे भरणे बाबत न्यायालय निर्देश देणार आहे. तसेच संशयितांनी महिन्याच्या एक तारखेला आणि पंधरा तारखेला पुणे पोलिसांना हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संशयितांनी ठेवीदारांचे सोबत कुठलाही संपर्क करावयाचा नाही, असे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सुनावणीदरम्यान प्रभावी युक्तिवाद केला.
यांचा झाला जामीन मंजूर
त्यात प्रामुख्याने आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), राजेश लोढा (जामनेर), अंबादास मानकापे (औरंगाबाद), जयश्री तोतला (मुंबई), प्रेम कोगटा (जळगाव), भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव) , प्रितेश जैन (धुळे) आदी जणांचा न्यायालयाने जामीन दिला आहे.